Friday, March 18, 2022

श्री लक्ष्मी मल्लमर्दन वज्र्यलेप एक अनुभव:

आपल्या भारताला परंपरा आणि संस्कृतीचा फार मोठा वारसा लाभला आहे. हिंदू धर्माची पाळेमुळे एवढी खोलवर रुजली आहेत की कितीही जरी आधुनिक विचारकर्ते असले तरी आपले मूळगाव, आपले कुलदैवत, आपले घरदार,आपले रीतिरिवाज मानणारी आणि आयुष्यात एकदा का होईना आपल्या गावच्या देवाच्या दर्शनाला जाण्याचा ही मंडळी प्रयत्न करतात. असाच एक देव, रत्नागिरी जिल्ह्यातील, चिपळूण तालुक्यातील वीर या गावी आहे. तिन्ही बाजूने डोंगर, डोंगरातून वाहणारा बारमाही धबधबा, सतत खळखळाट करत वहात असणारी नदी, अशा निसर्गरम्य देवपाट ह्या वीरच्या विभागात श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवतेचे भले मोठे मंदिर आहे आणि त्यामध्ये विराजमान झालेला ६ फूट उंच आणि 4.5 फूट रुंद असा हा देव सुमारे 350 वर्षापूर्वी वीर जवळील खाडीत एका नावाड्याला सापडला तो त्याने वीर मधील ब्राह्मण वर्गाला नेऊन दाखवला. बरेच दिवस खाडीत राहिल्यामुळे त्याची आधीच झीज झाली होती. तो खाडीतून बाहेर काढून त्याकाळी त्याची विधिवत पूजा अर्चा होऊन देवपाट येथे एक मंदिर बांधले गेले त्यात तो स्थानापन्न झाला. सध्याचे मंदिर 1940 साली बांधले असून ते अतिशय भव्य आणि डौलदार आहे. भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेत म्हणतात "परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।4.8।।" अगदी तसाच भाव असलेला कुमारावस्थेतील श्रीकृष्ण आठ मल्लांना मारत आहे असे चित्र या मूर्तीत आहे. कृष्णाचा मामा, मथुरेचा राजा कंस, त्याचा भाऊ अक्रूड याला, दोन्ही भाचे श्रीकृष्ण आणि बलराम याना वृंदावनातून मथुरेमध्ये घेऊन यायची आज्ञा देतो. त्या प्रमाणे अक्रूड त्यांना घेऊन मथुरेत येतो. रस्त्यामध्ये एका शंकराच्या मंदिरात एक शिवधनुष्य असते ते श्रीकृष्ण विनासायास उचलतो आणि त्याठिकाणी श्रीकृष्णाची ताकद ओळखू येते. मथुरेमध्ये एका पटांगणात कंसाचे बलदंड मल्ल चाणुर आणि मुस्टिक हे एक प्रदर्शनिय कुस्ती सामने खेळत असतात. कंसाने ठरवल्याप्रमाणे ते कृष्णाला भडकवण्यासाठी आव्हान देतात जेणेकरून श्रीकृष्ण आणि बलराम कुस्ती खेळायला आले की त्या कुमाराना लोळवून त्यांची हत्या करायची असा कंसाचा डाव होता. पण प्रत्यक्षात या दोन्ही मल्लाना ते दोन्ही भाऊ ठार मारतात आणि पुढे कंस आपल्या आठ भावांना श्रीकृष्णावर चाल करायला सांगतो तर त्या आठही भावांचा आणि कंसाचा श्रीकृष्ण वध करतो. त्यानंतर मथुरेच्या गादीवर मूळ राजा उग्रसेन याला बसवून श्रीकृष्ण आणि बलराम तेथून निघतात अशी ती अख्यायिका आहे. या मूर्तीची गेल्या 350 वर्षात वातावरणामुळे आणि अभिषेक वगैरे मुळे आणखीन झीज होऊन त्याचे मूळ स्वरूप केव्हाच नष्ट होऊ लागले होते. अशा वेळी वज्र्यलेप करून मूर्ती परत मूळ अवस्थेत आणण्याचा प्रयत्न तज्ज्ञांच्या मार्फत करता येतो. पूर्वी वज्र्यलेप करताना नैसर्गिक साधन सामग्री वापरली जायची पण आता नवनवीन रसायने बाजारात उपलब्ध आहे ती आणि दगडाची बारीक पावडर वापरून हा केला जातो. कोणी सांगेल सुवर्ण भसम वापरतात, मोत्याची पावडर वापरतात ते सर्व खोटे आहे. आमच्या देवाची मूर्ती अतिशय मोठी आणि कलाकुसरीच्या दृष्टीने किचकट असल्यामुळे कारागीर निवडणे एक मोठे आव्हान होते. या बाबतीत पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये असलेल्या म्युझियम विभाग, तसेच आर्किलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी यातील तज्ञ उपलब्ध आहेत पण या विषयात या विभागांची ऑफिशियल सेवा उपलब्ध आहे असे कळले नाही. चांगला कारागीर शोधण्यासाठी आम्ही तीन चार कारागिरांची कामे प्रत्यक्ष जाऊन बघितली. आपल्या बजेटमधील चांगला कारागीर शोधणे एक मोठे आव्हान असते. आमचे बजेट फार कमी होते म्हणून आम्ही कोल्हापूर येथील श्री दिपकराव ओतारी याना हे काम दिले. (त्यांचा मोबाईल नंबर +91 97624 45200). ओतारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात बरीच आणि चांगली कामे केल्याचे संदर्भ आम्हाला मिळाले ती कामे आम्ही स्वतः जाऊन बघितली. त्यांनी आणि त्यांचा मुलगा योगेश ओतारी यांनी आमचे काम फक्त 2 महिन्यात वीर येथे राहून पूर्ण केले. अतिशय एकाग्रतेने कलात्मक काम करणारी, मितभाषी, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणारी व्यक्ती म्हणून मी त्यांची नक्की शिफारस करेन. त्यांच्या कामाची गुणवत्ता हे दोन फोटोच देतील. एक जुना फोटो आणि एक नवीन फोटो. माधव भोळे 9819479791

Monday, March 14, 2022

डॉ केतकर ज्ञानकोश काय प्रकरण आहे हे? देवरूखे ब्राह्मण ज्ञातीशी त्यांचा काय संघर्ष होता?

डॉ केतकर ज्ञानकोश काय प्रकरण आहे हे? देवरूखे ब्राह्मण ज्ञातीशी त्यांचा काय संघर्ष होता? पुणे येथील ईतिहास संशोधक मंडळाचे प्रमुख इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ( वि. का. राजवाडे) यानी मंडळाच्या एका सभेत एक लेख प्रसिद्ध केला त्यामध्ये देवरुखे ब्राह्मण यांचे बद्दल अपमान जनक माहिती दिली त्यापैकी एक म्हणजे "साताऱ्या जवळ देवराष्ट्र नावाचे एक राज्य होते त्या युद्धात तेथील राजा हरला", त्या हरलेल्या राजाची प्रजा जी कोकणात आली ते देवर्षी म्हणजे पुढे झालेले देवरूखे". असे म्हटले होते. प्रत्यक्षात विजयनगर साम्राज्य जे विजयनगर पासून ते पश्चिम अरबीसमुद्र असलेल्या कोकणापर्यंत पसरले होते तेथील काही भाग मूळ आदिवासी मंडळींचे होते, त्यांना शेती करणे माहीत नव्हते. त्या मंडळींना शेती शिकवून त्यांचेकडून महसूल तयार करून तो राजापर्यंत पोहीचवण्यासाठी जी मंडळी कर्नाटकातून कोकण विभागात आली ते देवरूखे. रुखे म्हणजे कानडी मध्ये रूप. देव रुखे म्हणजे देवाचे रूप. ही मंडळी जी कोकणातील जमिनीवर राजाचे प्रतिनिधी म्हणून काम करू लागली त्यातून खोतकी निर्माण झाली. खोत आणि इनामदार असे दोन मंडळी राज्याला महसूल भरू लागली आणि पडीक जमिनीमधून राजाचे उत्पन्न वाढले. सत्ता बदलानंतर हे खोत आदिलशाही चे काम करू लागले. आमच्या वीर गावातील आलेल्या मूळ पुरुषांची आडनावे देशप्रभु अशी होती असे म्हणतात. पुढे लोकांनी आपापल्या गावांप्रमाणे नावे बदलली. कोकणात सर्व ठिकाणी गावकीच्या देवळात पालखीच्या आधी रूपे लावतात त्यावेळी राजसत्ता आणि पूर्व सत्ता असे दोन तट असतात. पूर्व सत्ता म्हणजे मूल निवासी आणि राज सत्ता म्हणजे ही खोत मंडळी, राज्याचे प्रतिनिधी. पूर्वीच्या काळी राज सत्तेच्या हुकुमाशिवाय देवाला रूपे लावून पालखी देवळा बाहेर पडत नसे अशी प्रथा होती आणि अजूनही काही गावात आहे. दुसरा अपमान म्हणजे "देवरूखे ही मागासलेले ज्ञाती असून ते तापट स्वभावाचे आहेत असे त्यात लिहिले होते". हे प्रतिथयश देवरुख्याना मान्य नव्हते. त्याकाळी भिकाजी मोरेश्वर मादुसकर या शिक्षकाने पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाच्या त्याच सभेत राजवाडयानच्या या लिखाणावर आक्षेप घेतला. राजवाड्यांनि त्यांना पुरावे ध्या मग हे लिखाण बदलतो असे लिहून प्रकरण दाबून टाकले. राजवाड्यांच्या दरारा जास्त होता म्हणून कोणी काही बोलले नाही. पुढे हे प्रकरण भिकाजी मोरेश्वर मादुसकरानी त्या काळचे प्रतिथीयश व्यक्ती रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर जे कलकत्ता येथे इंग्रजी आणि संस्कृतचे प्राध्यापक आणि पुढे लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्य ग्रंथाचे प्रूफ रीडर आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी ( 1907 च्या सुरत काँग्रेस मध्ये झालेल्या जहाल विरुद्ध मवाळ गदारोळात टिळकांना सुरक्षित बाहेर काढले त्या ग्रुप पैकी एक) याना सांगितली. त्यांनी संशोधन करून "चितळे भट्ट प्रकरण" हे पुस्तक लिहिले त्यामध्ये रत्नागिरी जवळील बसनी गावच्या चितळे नावाच्या एका धनाढ्य ब्राह्मणाने भानू तेरेदेसाई नावाच्या शिक्षित ब्राहणाचा क्षुल्लक कारणासाठी अपमान करून, देवरूखे ब्राह्मणांना कसे बहिष्कृत केले. या बाबतीत त्यावेळच्या देवरूखे मंडळींनी चितळे यांचे विरुद्ध इतर धर्म पीठे आणि काशी चा मुक्ती मंडप येथे दाद मिळवून निर्णयाची पत्रे मिळवून देवरूखे कसे दोषमुक्त आहेत हे सिद्ध केले आणि आणि तसेच चितळे यांच्या पणतू ने लेखी माफी मागून हे प्रकरण मिटवले. या सर्वांची कागदपत्रे मिळवून या सर्वांची टिप्पणी या पुस्तकात दिली. पुढे डॉ केतकरांनी ज्ञान कोष लिहिताना इतिहास संशोधन मंडळाचा लेख आधार मानून तोच मजकूर जसाच्या तसा छापला. त्यावेळी सुद्धा देवरूखे मंडळी केतकरांकडे गेली. त्यांनी पुरावा मागीतला तसेच देवरूखे ब्राह्मण महासभा किंवा परिषदेचा मजकूर बदलावा आणि नवीन मजकूर काय असावा म्हणून ठराव मागितला. तो देण्यास खूप वेळ लागला मधल्या काळात देवरूख्यांच्या तीन परिषदा झाल्या पण ठरावाच्या मसुध्यावर एकमत होत नव्हते ( पूर्वी परिषदा ज्ञातीच्या प्रगतीच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी घेतल्या जायच्या). हा पत्रसंघर्ष सुरूच होता. पुढे मराठी विश्वकोशा मध्ये हा मजकूर सुधारला गेला. अशी आहे देवरूख्यांबद्दल ची ज्ञानकोषाची कहाणी. या बाबतीत "आम्ही कोण आपले कोण" हे दामूअण्णा तेरेदेसाई, गोवंडी, तसेच " देवरूखे ब्राह्मणांचा इतिहास" ( देवरूखे मित्र मंडळ प्रकाशक) यामध्ये सविस्तर माहिती आपणास मिळेल. त्यापैकी देवरूखे ब्राह्मणांचा इतिहास या पुस्तकाची एक कॉपी मी स्वतः मित्र मंडळाचे वतीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका पॉली ओ हॅनलोन ज्या पूर्व आशिया इतिहास विभागाच्या प्रमुख होत्या त्या महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि त्यांच्या चाली रीती या वर संशोधन करीत होत्या त्यांना पाठवली. त्यांना वाजपेयी सरकारकडून ग्रांट प्राप्त झाली होती. पुण्यात आणि डेक्कन कॉलेज पुणे येथे काही काळ संशोधन केल्यामुळे त्यांना असखलीत मराठी येत होते. ऑक्सफर्ड विध्यापिठाच्या लायब्ररीत असलेले "देवरूखे ब्राह्मणाबद्दल शास्त्र संमत विचार - समज गैरसमज" हे विष्णू शास्त्री पंडित ( मदन मोहन मालवीय यांचे सहकारी) यांच्या पुस्तकाची कॉपी त्यांनी मला इमेल ने पाठवून दिली हे विशेष. माधव भोळे

Monday, February 21, 2022

समाजकारण करत असतान

 समाजकारण करत असताना...

ज्ञातीतील जेष्ठ कार्यकर्ते, देवरूखे ब्राह्मण संघ,विलेपार्ले (विसर्जित) चे माजी विश्वस्थ सी ए. श्री श्रीकांत महाजन यांनी मला एक सुचना केली. त्यांच्यामते मी ज्ञातीकार्यात गेले 40 वर्ष काम करत असल्यामुळे मला या विषयात जास्त अनुभव आहे, तो मी लोकांपर्यंत पोहोचवून नवीन पिढी ज्ञातीकार्यात  कशी पुढे येईल, या बद्दल चार वाक्य लिहावी व तसा प्रयत्न करावा. खरे म्हटले तर माझ्यापेक्षा जास्त अनुभवी मंडळी आपल्या ज्ञातीमध्ये आहेत पण आपले अनुभव मांडायला काय हरकत आहे असा विचार करून मी हा लेख लिहित आहे.


समाजकारण करायला कोणताही विशिष्ठ शिक्षणक्रम पूर्ण करण्याची गरज नसते. ज्याला समाजाबद्दल आपुलकी, कळकळ आहे तो समाजकार्य करू शकतो. ज्याला जीवनात काहीतरी चांगले काम करायचे आहे तो ह्यात रस घेतो. तसेच हे करण्यासाठी कोणतेही पद आवश्यक नसते. कार्यकर्ता हे जन्मसिद्ध पद प्रत्येकाला असते. 


सर्वसाधारण व्यक्ती वयाच्या 22 व्या वर्षी ग्रॅज्युएट होऊन साधारण 26/27 वर्षांपर्यंत त्याला मनासारखी नोकरी लागते. त्यानंतर तो आपली राहायची जागा, लग्न, संसार, करियर ग्रोथ असा विचार करून स्वतःला स्थापन करण्याचा ( establish) विचार करतो. हे करे करे पर्यंत वयाची 40 शी उजाडते. त्यानंतरच तो समाजकारणामध्ये लक्ष घालतो. तेही स्वाभाविक आहे कारण जो स्वतःची उन्नती करु शकतो तोच समाजाच्या उन्नतीसाठी काम करू शकेल.


समाजकार्याचे अनेक फायदे आहेत. यात येण्यापूर्वी आपण घर, नोकरी आणि आसपासच्या गोष्टीबद्दल विचार करत असल्यामुळे आपले ज्ञान मर्यादित असते.  समाज कार्यात गेल्यानंतर समाजातील विविध थरांमध्ये विविध अडचणी, त्यावरील उपाय तसेच संस्थेचा वेगवेगळ्या विषयाशी येणारा संबंध इत्यादी विषयाची माहिती आपल्याला होत असते, त्याचा आपल्या जीवनात कुठे ना कुठे उपयोग होत असतो. 


सभेचे शिष्टाचार काय आहेत ते समजून घेणे, विविध विषयांवर सखोल चर्चा करणे,  त्यात आपले मतप्रदर्शन करणे, एकमताने निर्णय होत नसेल तर बहुमताचा उपयोग करून निर्णय घेतला जातो त्यावेळी जरी आपल्या मताच्या विरुद्ध बहुमत असेल तरी तो मान्य करून तो संस्थेचा निर्णय म्हणून त्यावर उचित कार्यवाही करणे. त्याच बरोबर जर बहुमतचा निर्णय खरोखरच संस्थेच्या किंवा समाजाच्या हिताचा नसेल तर आपले मत कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता ठामपणे मांडणे आणि ते मिनिट्स मध्ये नोंद करवून घेणे, विरोधासाठी विरोध न करता सहमतीने काम करण्याचा कसोशीने प्रयत्न करणे इत्यादी गोष्टी शिकणे अत्यन्त आवश्यक आहेत.


माझ्या 40 वर्षाच्या काळात मी अनेक कार्यकर्ते बघितले आहेत जे काही विशिष्ठ हेतू घेऊन समाजकारणामध्ये येतात आणि तो हेतू साध्य झाला नाही की त्यांची निराशा होत असते.  किंवा तो हेतू साध्य करण्यासाठी वेळ पडल्यास संस्थेचे हित दावणीला लावतात. स्वतःचा काहीतरी हेतू घेऊन येण्यापेक्षा संस्थेत काम सुरू केल्यानंतर संस्था ज्या विशिष्ट कारणासाठी स्थापन झाली त्याची उद्देशपूर्ती  किंवा त्या उद्देशपूर्तीचे नैसर्गिक रुंदीकरण ( Natural Expansion ) करण्यासाठी आपण काम करायला हवे.


 "मी म्हणतो म्हणून" हा विचार असता कामा नये. बरेच वेळा नवीन येणारे कार्यकर्ते आपला काही नवीन विचार किंवा कार्यपद्धती रुजवायचा प्रयत्न करतात. अर्थातच जुन्या मंडळींना जुने विचार किंवा त्यांची कार्यप्रणाली सोयीस्कर किंवा योग्य वाटत असते आणि ते स्वाभाविक आहे याला inertia म्हणजे स्थिती स्थापकत्व असे म्हणतात. त्यामुळे संस्थेत नवीन विरुद्ध जुने असे विभाजन होत असते आणि तेथून वादाला सुरवात होते. नवीन कार्यकर्त्यांचा विचार किंवा कार्यप्रणाली कितीही चांगली आणि शास्त्र शुद्ध असली तरी प्रथम नवीन कार्यकर्त्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळून जाणे आवश्यक असते. आपण एखादी छोटी जबाबदारी घेऊन ती पार पाडून दाखवल्यावर आपल्यावरील विश्वास वृद्धिंगत होऊन आपले म्हणणे ऐकावयास जुने लोक तयार होतात आणि त्यानंतर आपण आपला नवीन विचार सर्व शंका निरसन करत मांडलात तर त्याचे नक्कीच स्वागत होते. निदान त्यावर विचार केला जातो. अगदी हीच गोष्ट आपण नवीन ऑफिसमध्ये कामाला लागलात तरी करायला लागते, भले तुम्ही कितीही अनुभवी असाल. मी याला "मुंगी होऊन साखर खाणे" म्हणतो. आपल्या वागणुकीत नम्रपणा असेल तर त्याचा पटकन स्वीकार केला जातो. तुम्ही आपल्या व्यक्तिगत जीवनात कोण आहात या पेक्षा संस्थेचा कार्यकरिणीमध्ये सर्व सभासद सारख्याच स्तरावर असतात याचा आपण विसर पडू देता कामा नये.


आपल्या ज्ञातीचे काम करताना आपल्या संस्थांच्या कार्यक्रमात ज्ञातीच्या मंडळींना कसा वाव मिळेल, ज्ञातीतील आदर्श काय आहेत ते समाजासमोर आणयला हवेत, कारण तरुणांना ते आपले वाटतील आणि त्यांचे पासून प्रेरणा घेऊन ज्ञातीची नवीन पिढी तयार होईल. बेडेकर मसाल्यापेक्षा आमचा शंतनू मसाले वाले आमच्या पिढीला महिती हवेत. कामत हॉटेल पेक्षा दत्तस्नॅक्स वाले आम्हाला आपले वाटतात, कारण ते आपल्यातून पुढे गेले असल्यामुळे आमची पुढील पिढी सुद्धा ते करू शकेल याची त्यांना प्रेरणा निर्माण होते. आपण आपल्या ज्ञातीच्या प्रगतीसाठी काम करायला हवे. ज्ञातीच्या गरजा बदलत असतात त्याप्रमाणे संस्थांनीही आपल्या विचारात बदल करायला हवे. संस्था समाजाला उपयोगी असतील तर त्या टिकून रहातील.


साधारण 40 ते 65-70 हे वय समाजकारण करायला चांगले. 70 वर्षा नंतर त्या कार्यकर्त्यांने  स्वतःहून बाजूला व्हायला हवे जेणेकरून नवीन पिढीला वाव मिळतो. अनेक जुन्या संस्थांमध्ये विश्वस्थ आणि कार्यकारी मंडळ अशी दुस्तरीय व्यवस्था असते. विश्वस्थ हे जेष्ठ असतात, अशा ठिकाणी  70 वर्षावरील मंडळींनी मार्गदर्शक म्हणून काम करायला हरकत नाही पण कार्यकारी मंडळात शक्यतो 70 वर्षापर्यंतच मंडळींनी काम करावे असे मला वाटते. आपण कार्यकारी मंडळात काम करा अथवा विश्वस्थ मंडळात काम करा लोक आपल्याकडे विश्वासाने बघत असतात. आपली प्रत्येक कृती एक जबाबदार नागरिक आणि समाजाचा घटक म्हणून तपासली जात असते. या बाबतीत एक म्हण आहे "you can fool some people some time, but not all the people all the time". म्हणून विश्वास असणे महत्त्वाचे.


एकाच वेळी अनेक संस्थांमध्ये काम करण्याचे साहस करण्यापेक्षा एक किंवा जास्तीतजास्त दोन संस्थांमध्ये चांगले काम करून समाजाच्या उपयोगी पडण्याच्या आपल्या मूळ उद्देशाकडे आपण लक्ष ध्यायला हवे. बरेच लोक नुसते पद भूषवण्यासाठी संस्थेत वर्षानुवर्षे काम करतात पण प्रत्यक्षात ते स्वतःचा आणि संस्थेचा वेळ फुकट घालवत असतात. त्यापेक्षा जो खरोखरच इच्छुक आहे त्याचे साठी हे पद रिक्त करणे आवश्यक आहे. मी नसेन तर संस्थेचे कार्य कोलमडेल असा विचार चुकून सुद्धा करू नये कारण केशवसुत म्हणतात "पळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय?" किंवा "No body is indispensable".  बरेच लोक संस्थेचे संस्थानिक बनतात आणि आपली संस्था माझी संस्था म्हणून समजतात पण ते घातक आहे.


ज्यांनी या गोष्टी कसोशीने पाळल्या तो यात नक्कीच यशस्वी होईल. म्हणतात ना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. सर्वांना हे जमेलच असे नाही पण या यज्ञात आपला खारीचा वाटा आपण घेऊ शकतो.


मध्यंतरी आपले रत्नागिरी येथील एक कार्यकर्ते श्री उल्हास मुळे, कलझोनडी यांचेशी संवाद झाला. आपली एक ओरड असते की नवीन पिढीला समाजकार्यात स्वारस्य नाही. त्यावरती अशी चर्चा झाली आपल्या ज्ञातीत अनेक संस्था आहेत, शिवाय प्रत्येक गावात एक दोन धार्मिक संस्था आहेत, पण आपली ज्ञाती छोटी आहे आणि नवीन पिढीला वेळ नाही असे त्यांचे म्हणणे असते. या सर्व संस्था चालवणे आजकाल नक्कीच कठीण होत आहे. कारण संस्था चालवणे, हिशोब करणे, ऑडिट करणे, चेंज रिपोर्ट करणे, इन्कम टॅक्स आणि चॅरिटी कमिशनरला सबमिट करणे या सगळ्या संविधानिक गोष्टी करणे कठीण होत चालले आहे कारण ते वेळ खाऊ आहे आणि त्यासाठी कोणी वेळ ध्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत या पैकी ज्या संस्था समान किंवा समुद्देशी कार्य करतात त्याचे एकत्रिकरण करणे, ज्या संस्था diffunct आहेत त्यांची काहीतरी कायदेशीर व्यवस्था करायला हवी आणि हाताच्या बोटावर राहतील एवढ्याच संस्था शिल्लक ठेवाव्यात, यावर सांगोपांग आणि समग्र विचार करणे आवश्यक आहे. नुसती ही संस्था आमच्या पूर्वजांनी स्थापन केली म्हणून ती रडत कुथत चालू ठेवण्यापेक्षा एकतर ती नीट चालवा किंवा तिचा काहीतरी विचार करा. अर्थात हे सर्व समाजाचे काम आहे. यात माझ्या पेक्षा जे जास्त अनुभवी आहेत त्यांनी सुद्धा याचा विचार करायला हवा. जसे वल्लभभाईनी 543 संस्थाने एकत्र करून एक बलशाली भारत बनवला तसेच या संस्थांबाबत विचार करणे आवश्यक आहे, नाहीतर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. 


माधव भोळे.

Thursday, February 17, 2022

देवरूखे ब्राह्मण 1

काल एक मित्र भेटला होता. म्हणाला त्याच्या मुलीचे लग्न करायचे आहे. मुलगी शिकलेली आहे, ति नोकरी सुद्धा करते, दिसायला सुंदर आहे. एक देवरूखे ब्राह्मण मुलगा सांगून आला आहे. चांगला शिकलेला आणि होतकरु आहे. नोकरी सुद्धा उत्तम आहे. मी म्हटले मग अडचण काय आहे? म्हणाला देवरूखे ब्राह्मण ही ज्ञाती मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. मी विचारले तुमची ज्ञाती कोणती? तो म्हणाला आम्ही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मी विचारले तुम्ही शाकाहारी का? तो म्हणाला हो आम्ही शाकाहारी. तुमचे मुळगाव गाव कोणते ? तो म्हणाला आम्ही लातूर चे. मी म्हटले बरे, आता नीट समजावून घे. मराठी ब्राह्मण हे पंच द्रविड ब्राह्मण मध्ये येतात. जे ब्राह्मण गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू मध्ये रहातात त्यांना पंच द्रविड ब्राह्मण असे म्हणतात यातील बहुतेकांचे संस्कार आणि चालीरीती सारख्या असल्यामुळे ते एका समूहात ( ग्रुप) मध्ये धरले जातात. भारतातील उरलेल्या सर्व ब्राह्मणांना पंच गौड ब्राह्मण असे म्हणतात. या पैकी महाराष्ट्रात पाच मुख्य प्रकारचे मराठी शाकाहारी ब्राह्मण आहेत. कोकणस्थ किंवा त्यातील काही स्वतःला चित्तापावन म्हणवतात, देशस्थ यांच्यामध्ये परत दोन उपशाखा आहेत देशस्थ ऋग्वेदी, देशस्थ यजुर्वेदी, कऱ्हाडे, देवरूखे. या पैकी देवरूखे हे बहुल्यकरून करून संपूर्ण रत्नागिरी जिल्हा, कर्जत (रायगड), उंबरगाव पंचक्रोशी जी गुजरात बोर्डरजवळ आहे, मध्यप्रदेश मधील पूर्वीची संस्थाने, बडोदा गुजरात या ठिकाणी आढळतात. यांची प्रमुख आडनावे म्हणजे वीरकर, निमकर, निंबकर, कारूळकर, पिंपुटकर, जुवेकर, कार्येकर, कराडकर, मुळे, भोळे, काळे, कोकजे, ढापरे, ढालकर इत्यादी. देवरूखे मूलतः सर्व शाकाहारी मंडळी असून पूर्वी ह्यांचे व्यवसाय म्हणजे भिक्षुकी, शेती, कारभारी ( मॅनेजर), हिशोब तपासनीस, हॉटेल व्यवसाय, सरकारी नोकऱ्या. आजकाल इतर सर्व समाजांप्रमाणे यांची मुले सुद्धा विविध विषयात प्राविण्य मिळवत असून आपापले बुद्धिमत्व सिद्ध करत आहेत. सचोटी, प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा, मेहेनत करणे आणि औदार्य हे त्यांच्यापैकी अनेकांचे स्थायीभाव आहेत. अगदी ओळखच ध्यायची झाली तर महाराष्ट्रातील पहिली इंग्रजी मराठी डिक्शनरी ज्या विद्वानांनी लिहिली ते के. बी. ( कृष्णाजी भास्कर) वीरकर, डिक्शनरी वाले हे सुद्धा देवरूखेच आणि वीर या चिपळूण जवळील गावातले. अनेक उच्चविद्याविभूषित आणि थोर मंडळी या समाजात सुद्धा होऊन गेली आणि आहेत. तू योग्य चौकशी करून बीनधास्त या स्थळाबद्दल विचार करायला हरकत नाही. खरे म्हणजे आजकाल एव्हडे शाखाभेद कोणी मानत नाहीत कारण सर्व ब्राह्मण विशेषतः मराठी ब्राह्मण एक होणे आवश्यक आहे तरी पण तू विचारलेस म्हणून ही माहिती सांगितली. मित्राने म्हटले, आता मला बऱ्यापैकी उलगडा झाला, नाहींतर माझ्या अज्ञानामुळे मी एका चांगल्या व्यक्तीला मुकलो असतो. असो, माधव भोळे

देवरूखे 2

कालच्या माझ्या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्धल धन्यवाद. त्यातील काहींच्या अर्धवट ज्ञानामुळे चुकीची माहीती पसरत होती त्यांना दिलेले हे उत्तर. त्यांचे म्हणणे होते की ही मंडळी कमी महत्वाची कामे करत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी थोडक्यात सांगतो: देवरूखे हे ऋग्वेदी ब्राह्मण असून त्यातील अनेक लोक अतिउच्चशिक्षित होते. सध्याचे कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविज्ञापिठाचे ( भारतातील पाहिले संस्कृत विद्यापीठ) पाहिले कुलगुरु डॉ. पंकज चांदे हे देवरूखे आहेत. एके काळी भारतातील 640 विद्यापीठाच्या असोसिएशनचे ते अध्यक्ष होते आणि जागतिक विद्यापीठानच्या असोसिएशनच्या, असोसिएशनचे असलेल्या एका कॉन्फरन्स चे सुद्धा काही काळ अध्यक्ष होते. या मध्ये आय आय टी, आय आय एम सारखी विद्यापीठे सुद्धा होती. त्यांचा 24 पानांचा बायोडेटा फक्त एका पानाच्या सत्कार पत्रात कँसॉलिडेट करताना माझी त्रेधा तिरपीट उडाली होती. कै. रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर हे इंग्रजी आणि संस्कृतचे कलकत्ता येथील प्राध्यापक आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी होते आणि गीता रहस्यच्या मुद्रशोधन ( प्रूफ रिडींग) मंडळात त्यांनी काम केले असा उल्लेख त्याच ग्रंथात आहे. पंडित रघुनाथ शास्त्री कोकजे हे ज्ञानप्रबोधिनी पुणेचे संस्थापक सदस्य होते हिंदू धर्मातील अनिष्ठ प्रथांवर लिखाण करण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांच्या नवयुग या मासिकात पाचारण केले होते. वीर वामनराव मुकादम, गोध्रा, गुजरात, हे वल्लभभाई पटेलांचे बारडोली सत्याग्रहातील उजवा हात होते. त्यांनी गुजराथी मधून लिहिलेले महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतिशय नावाजलेले चरित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुनर्मुद्रित करण्यासाठी घेतले होते. कै लक्षुमणराव भोळे हे 1945 ते 1985 पर्यंत मुंबई शेयर बाजारात असलेल्या 4 ते 5 मराठी लासनस शेयर ब्रोकर पैकी एक होते. ते स्वतः एम कॉम एल एल बी होते. महात्मा फुले यांचे सहकारी कै वासुदेव बाबाजी नवरंगे हे लंडन स्थित देवरूखे व्यापारी असून फुल्यांच्या अनेक सामाजिक कार्यात त्यांनी भरघोस आर्थिक पाठिंबा दिला आहे. त्यांनी नाबलीक विधवा आणि परीतक्त्या महिलांकरिता पंढरपूर येथे महिलाश्रम काढला आहे तर त्यांची सुविध्य पत्नी कै. डॉ काशीबाई नवरंगे ह्या मुंबईतील सेवा सदन ह्या काँग्रेस च्या महिला चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या आणि त्यांचे नावाने गावदेवी, ग्रांट रोड, मुंबई येथे 5 मजली महिला वसतिगृह आहे. कै विष्णू नारायण मांदुसकर ह्यांनी 1914 साली इंग्रजीत अनुवादित केलेले ब्रह्म निरूपण संस्कार हे ह्या विषयातील रेफरन्स पुस्तक म्हणून वशिंग्टन च्या लायब्ररीत ठेवले आहे. एके काळी उलट बाजूला ड्राइव्ह केले म्हणून ट्राफिक हवालदाराकरवी आपल्या पत्नीला दंड करणाऱ्या मुंबई म्युन्सीपल कमिशनर आय सी एस पिंपुटकर यांचा दरारा तर सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. महाराष्ट्रातील पहिली इंग्रजी मराठी डिक्शनरी कै. कृष्णाजी भास्कर वीरकर, तर पहिली संस्कृत मराठी इंग्रजी डिक्शनरी कै. बळवन्त यशवंत जोशी ( आर एम भट हायस्कुल परळ चे मुख्याध्यापक) यांनी काढली हे दोन्ही देवरूखेच. अगदी एवढेच काय स्वर्गीय लता दीदी आणि त्यांचे पिताश्री यांचें घरी माझे चुलत बंधू ( कै. भार्गव एकनाथ भोळे) आणि त्यांचा चार पिढ्यांचा परिवार पौरोहित्य करत आला आहे. आता त्यांचे नातू हे काम मंगेशकर कुटुंबीयांकडे करतात. त्यांचे काका ( कै शंकर प्रभाकर भोळे ) दिनानाथांकडे पौरोहित्य करत असत. देवरूख्यांमध्ये फार थोडेच हाताच्या बोटावर मोजण्याइतके कमी शिकलेले ब्राह्मण अंत्यसंस्कार ची कामे करत असत पण बाकी अनेक उच्चशिक्षित ब्राह्मण नैमित्तिक पौरोहित्याची कामे अजूनही करतात. त्यामुळे देवरूखे कमी दर्जाची कामे करत हा vested interest असलेल्या मंडळींचा अपप्रचार किंवा चुकीची माहीती सुधारण्याच्या ह्या हेतूने ही माहिती दिली आहे. असो या विषयात जास्त माहिती घ्यायची झाल्यास http://devarukhe.blogspot.com/2018/ ह्या लिंकवर जरूर मिळेल. माधव भोळे

Saturday, July 31, 2021

देवरुखे समाजाच्या जडणघडणीमध्ये देवरुखे ज्ञाती संस्थांचा अमूल्य वाटा

देवरुखे समाजाच्या जडणघडणीमध्ये देवरुखे ज्ञाती संस्थांचा किती अमूल्य वाटा आहे याचे एक उत्तम उदाहरण म्हणून देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधीला आलेले एक पत्र देणगीदाराच्या परवानगीने आवर्जून प्रसिद्ध करत आहे.

३१.०५.२०२१

प्रति;  अध्यक्ष

देवरुखे ब्राम्हण अनाथ कौटुंबिक निधी, मुंबई

स.न. वि. वि.

मी पाच वर्षाचा असताना माझे वडील १९४७ साली निर्वतले. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीनुसार, आईवर डोंगरच कोसळला. कोणतेही आर्थिक साधन नाही त्यात आईच्या पदरी आम्ही दोन मुले होतो. अशा परिस्थितीत आई आम्हाला घेऊन आमच्या आजोळी म्हणजे खत्तलवाड येथे श्री डांगे यांचेकडे आली.

कोणताही आर्थिक आधार नाही, स्वतःची शैक्षणिक पात्रता नाही. होता फक्त  आजोळचा भक्कम मानसिक आधार!. आईने अपार कष्ट करून, आम्हाला शिकवून येथपर्यंत आणून सोडले. त्या वेळी कै. मोरूभाऊ ढापरे यांनी आईची दयनीय अवस्था बघून संस्थेकडे अर्ज करण्यास सांगितले.

मला साल आठवत नाही पण साधारण १९५४ - ५६ चे दरम्यान आईला वार्षिक रुपये २०/- अशी लागोपाठ २ वर्ष मदत मिळाली. त्या चाळीस रुपये मदतीचे मोल अनन्य आहे. मी आता ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि त्यानिमित्त संस्थेला रु ५०,००० ची देणगी देत आहे तिचा स्वीकार व्हावा.

आपला नम्र,

श्री सुहास विठ्ठल मुळे, कीर्ती सोसायटी ठाणे (पूर्व), 400 603.

 

 

श्री चंद्रकांत जोशी ( C. N. Joshi), रत्नागिरी, यांचे २० मे २०२०

 दुःखद निधन


रत्नागिरी येथील प्रतिथयश कारखानदार श्री चंद्रकांत जोशी ( C. N. Joshi), रत्नागिरी, यांचे २० मे २०२० रोजी सकाळी वृद्धापकाळाने देहावसान झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ होते. घरची परिस्थिती मध्यम असताना आणि तांत्रिक शिक्षण नसताना सुद्धा त्यांनी डोंबिवली येथे, भागीदारीत मशीन पार्टस चा छोटा कारखाना काढला. पुढे वयाच्या ३६ व्या वर्षी नशीब अजमावण्यासाठी त्यांनी रत्नागिरी येथे एम. आय. डी. सि. ची जागा घेऊन, श्री एंटरप्राइज या नावाने नवीन कारखाना उभारला.

तो स्थिरस्थावर होईपर्यंत काही वर्षे कारखान्याच्या शेडच्या एका खोलीत संसार आणि दुसऱ्या खोलीत मशिनरी असा थाट होता. पुढे कारखाना जोमात चालायला लागला आणि अडचणी दूर होत गेल्या तसा त्यांनी कारखान्या समोरच नवीन बंगला बांधला. रत्नागिरी सारख्या दूरठिकाणी असून सुद्धा खात्रीशीर आणि किफायतशीर मूल्यात माल, वेळेत काम, आणि मेहनती कामगार वर्ग यांच्या जोरावर त्यांनी महेंद्र आणि महेंद्र, बजाज ऑटो सारख्या दिगग्ज कंपन्यांशी आपला सबंध जोडला. वयाच्या साठी नंतर त्यांनी हळूहळू कारखान्याची सूत्र मुलगा अतुल याच्या ताब्यात दिली. अतुलने हा कारखाना आपल्या कौशल्य आणि मेहनतीवर आणखी बहरास आणला आहे. 

त्यांचे पश्चात त्यांची पत्नी वैशाली, मुलगा अतुल, स्नुषा आदिती, मुलगी अपर्णा व जावई आणि नातवंड आहेत.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.

माधव भोळे